2020
दोन वर्षांपूर्वी, २०२० साली भारतीय जनता पार्टीने फार मोठी जबाबदारी खांद्यावर टाकली. भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक केली. कौटुंबिक राजकीय वारसा नसलेल्या कार्यकर्त्याला हे पद अन्य कुठल्याही पदापेक्षा अमूल्य असेच आहे. विचारधारेवर निष्ठा असणाऱ्या डोंबिवलीचा व डोंबिवलीकरांचाच हा सन्मान समजून ध्येयाने झपटल्याप्रमाणे कार्यरत राहिलो. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यावर कामाची पोचपावती म्हणून की काय पक्षाने विश्वासाने कॅबिनेट मंत्रिपद दिले आणि महत्वाचे, जवाबदारीचे असे सार्वजनिक बांधकाम खाते मला देण्यात आले. ह्या बरोबरच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात्याची पण जवाबदारी देण्यात आली. याशिवाय पालघर आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पण देण्यात आली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर १८-२० वर्षांमध्ये भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांना काय समस्या आहेत त्या मी स्वतःही अनुभवत होतो. डोंबिवलीत तर नागरी समस्यांचं न संपणारं दुष्टचक्र होतं. आजही ते संपलं नाही. पण केवळ भाजपाचे मतदार म्हणून या आधीचे शासनकर्ते आपल्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते. ते त्यांनी थांबवलं. डोंबिवलीकरांच्या हक्कासाठी संघर्ष केला प्रसंगी कोर्टात खेचले. केडीएमसी, एमआयडीसी, एमएमआरडीए, मध्य रेल्वे, महावितरण यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र शासकीय खाती यांच्याविरोधात जन आंदोलन उभारलं. डोंबिवलीतलं लोड शेडींग रद्द करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगात दाद मागणारा मी महाराष्ट्रातील एकमेव आमदार ठरलो. आणि माझ्याच पाठपुराव्याने महाराष्ट्रातील सर्वात पहिले लीडशेडींग मुक्त शहर डोंबिवलीच झाले.
डोंबिवली महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी… डोंबिवलीकर मासिकाच्या माध्यमातून साहित्य सेवा सुरु आहे. मासिक गेले 13 वर्षे वाचकांच्या प्रथम पसंतीचे ठरलेले आहे. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा सलग 12 वर्षे पुरस्कार मिळवत आहे. डोंबिवलीकर कॅलेंडर हा उपक्रम विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या डोंबिवलीकरांना प्रकाशझोतात आणत आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने “सबका साथ सबका विकास” हेच विकासाचे धोरण ठेऊन प्रगतीची घोडदौड सुरू केली. आता महाराष्ट्रात लोकांनी कौल दिलेल्या नैसर्गिक मित्रपक्षांचे शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेत आलेले आहे. मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात दमदार सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी सज्ज झाले आहे.