महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात असून या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे. या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक संस्थांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब होत असला, तरी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना केले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ न देणाऱ्या शिक्षणसंस्थांची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
काय आहे छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना?
छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, पदुम, वैद्यकीय शिक्षण अशा विभागाअंतर्गत येणाऱ्या तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये लागणाऱ्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत राज्य शासनामार्फत देण्यात आली आहे.
या वर्षापासून वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ५० टक्के शुल्क सवलतीचा फायदा मिळणार आहे.
गेल्या वर्षी या योजनेअंतर्गत ४०० कोटी रुपये खर्च झाले असून आतापर्यंत २ लाख ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ९५८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Leave Your Comment