राजकारणातल्या माणसांबद्दल बोलणं किंवा लिहिणं, खरं म्हणजे मी टाळतोच. कारण त्यांच्या मुखवट्यामागचा खरा माणूस शोधणं हे शेरलॉक होम्ससारख्या चतुर हेरालाही कठीणच! पण याला एका माणसाचा मला अपवाद करावासा वाटतो व तो म्हणजे ‘दादा’ (आ. रविंद्र चव्हाण) यांचा, विचार, उच्चार आणि आचार यात एकसूत्रता, एकसंघपणा असणारी. हाताच्या बोटावर मोजता येणारी जी काही थोड़ी माणसं आपल्याला आज पाहायला मिळतात त्यातील एक म्हणजे रविंद्र चव्हाण, माणूस कसा पारखावा? एका संस्कृत कवीने याच्या फार चांगल्या कसोट्या दिल्या आहेत. तो म्हणतो, “।। यथा चतुर्भिः कनकं परिक्षते, निधर्षणच्छेदनताप ताडनैः ।। ॥ तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते श्रुतनशीलेन गुणेन कर्मणा ।।
ज्याप्रमाणे सोन्याची शुद्धता ठरविण्याकरिता चार कसोट्या त्याला लावाव्या लागतात. घासून त्याची चकाकी, तोडून त्याचा चिवटपणा, तापवून ते काळे पड़ते की काय ते पाहणे आणि हातोडीने ठोकून त्याचा मऊपणा हा गुण कसाला लागतो. त्याप्रमाणे मनुष्य हा चांगला ठरतो तो त्याच्या गुणांनी, चारित्र्याने बहुश्रुतपणा, ज्ञान आणि वर्तनाने! या चारही कसोट्यांवर रविंद्र चव्हाण कोठे उतरतात? याचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल दादा म्हणजे एक खणखणीत नाणं आहे!
रोटरी, ब्राह्मणसभा, चिदानंद चैरिटेबल ट्रस्ट, रक्तपेढी, डोंबिवलीकर मासिक, अशा विविध माध्यमांतून माझा दादांशी संपर्क झाला आणि प्रत्येक वेळी हा माणूस मला अधिकाधिक भावत गेला, विषयांची आणि सामाजिक संदर्भाची उत्तम जाण, प्रश्नांच्या खोलात जाऊन अभ्यासाची तयारी, ते ते विषय लावून धरण्याकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वा तुरूंगात जाण्याचीही तयारी, विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करतांना त्या त्या विषयातल्या तज्ज्ञांबरोबर चर्चा करून योग्य दिशा ठरविण्याचं शहाणपण मोठमोठे प्रश्न धसास लावत असतांना सर्वसामान्यांची दैनंदिन अडचण निवारण्याचा कनवाळूपणा, साहित्यिक व सांस्कृतिक उच्च अभिरुची, उत्तम सोशल नेटवर्किंग अशा एक ना अनेक गुणांचा एक बहारदार गुच्छ म्हणजे रविंद्र चव्हाण!
डोंबिवलीतील रस्त्यांचा प्रश्न, दत्तवाडी झोपडपट्टीचे पुनर्वसन, सावरकर रोड व अन्य ठिकाणच्या सार्वजनिक बागांची निर्मिती, गरजू विद्यार्थ्यांकरिता पुस्तकपेढी, गोविंदवाडी कल्याण बायपास रोडकरिता जेल भरो आंदोलन, डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवार चळवळीची भक्कम उभारणी, विविध सामाजिक प्रकल्पांना वैयक्तिक स्तरावर व आमदार निधीतून आर्थिक मदत, डोंबिवलीकरांचा वीज प्रश्न अशा अनेकविध प्रश्नांची दादांनी यशस्वी हाताळणी केल्याचे मी जवळून पाहिले आहे. या सर्व धामधुमीत वैयक्तिक जिव्हाळा जपणे, विचारपूस करणे आणि फोनवरील आमंत्रणाचाही आदर राखून एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावणे व मुळात फोनवर उपलब्ध असणे ही दादांची मला भावलेली खास वैशिष्ट्ये सांगता येतील. ‘दादांचा आजपर्यंतचा समाजकारणातला व राजकारणातला प्रवास व यश हे निश्चितच उल्लेखनीय
वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा आणि पुढील गरुड झेपे करिता परमेश्वर चरणी प्रार्थना!
डॉ. उल्हास कोल्हटकर (बालरोगतज्ज्ञ)
अध्यक्ष ब्राह्मण सभा डोंबिवली
अध्यक्ष जनरल एजुकेशन इन्स्टिट्यूट