पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेश नेहमीच शिरसंवाद्य मानून त्या कामात झोकून काम करणारे व त्या कामाला १०० टक्के न्याय देणारे पक्षाचे एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणजे रविंद्र चव्हाण. दादा या प्रेमळ नावाचीही त्यांना ओळख लाभली आहे. गेली अनेक वर्षे एका सच्चा कार्यकर्ता पक्षाचे कार्य करीत तितकत्याच जोमाने संघटना वाढविण्यात त्यांचे कौशल्य आहे. दिवस असो वा रात्र फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचे प्रश्न समजवून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याची क्षमता त्यांच्या कार्यपध्दतीमध्ये दिसून येते. सामान्य कार्यकर्त्याच्या एका हाकेला काळ वेळची पर्वा न करता धावून जाणारे संयमी, शांत व नम्र कार्यकर्ता. परंतु प्रसंगी जनतेच्या हक्कासाठी, एखादया प्रश्नावर व अन्यायाविरोधात संघर्ष करताना अतिशय आक्रमपणे रस्त्यावर उतरणारे व त्या प्रश्नाची तड लावणारे कॅबिनेट मंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांचा हा वाढदिवस…रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ता त्यांचे अभिष्टचिंतन
रविंद्र चव्हाण यांची माझी पहिली ओऴख साधारण २०२१ मध्ये झाली. नक्की महिना आठवत नाही. परंतु विधानपरिषदेचे तत्कालिन विरोधी पक्ष नेते श्री. विनोद तावडे यांच्या सोबत माध्यम समन्वयकाचे काम असताना त्यांची भेट व्हायची. शांत, कमी पण मोजकेच बोलणारे, हात दाखविला तर स्मित हास्य करणारे रविंद्र चव्हाण यांना तेव्हापासून मी ओळखतो. त्यानंतरच्या काळात पक्षाच्या विविध कार्यक्रमात त्यांच्याशी संर्पक आला. २०१४ मध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी मी मंत्रालयात असायचो, त्याकाळात अनेक वेळा त्यांची भेट व्हायची. पण नेहमीप्रमाणे काय कसे काय बरा आहेस ना…या दोन-चार वाक्यांच्या पलीकडे अधिक संवाद कधीही झाला नाही. त्या काळात मंत्रालयातही नेहमी नागरिकांची गर्दी असायची, नागरिकांची कामे होण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड असायची.
तत्कालिन फडणवीस सरकारच्या काळात रविंद्र चव्हाण यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. त्यावेळी विधीमंडळाच्या वार्ताहर गॅलरी मधून त्यांची विधीमंडळातील मंत्रीपदाची कामगिरी पाहण्याची संधी मिळाली. विधीमंडळातील प्रश्नोत्तरे असो नाही तर लक्षवेधी सूचना असो अथवा एखादी अल्पकालीन चर्चा…सदस्यांच्या प्रश्नांना अतिशय मुद्देसुद व समाधाकारक उत्तरे देण्यामध्ये त्यांचा हातखंडा त्याकाळात पाहिला आहे. विधीमंडळातील विरोधकांच्या राजकीय टोलेबाजीला जास्त उत्तरे न देता एखाद्या प्रश्नाला सरळ भाषेत उत्तरे देण्यावरच त्यांचा अधिक भर असायचा. प्रथमच राज्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राजकीय कसोटीच्या दृष्टीने महत्त्वाचे सभागृह असलेल्या विधिमंडळात त्यांनी संसदीय कामकाज अतिशय यशस्वीपणे व समर्थपणे सांभाळले. विरोधी पक्षांच्या बाकावर राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसची दिग्गज मंडळी असतानाही त्यांनी त्यांना तितक्याच सुयोग्य पध्दतीने व समर्पकरित्या उत्तरे देताना मी पाहिले आहे.
२०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही विरोधी पक्षाचे आमदार व पक्षाचे पदाधिकारी या नात्याने त्यांनी अनेक वेळ सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारशी न्याय हक्कासाठी संर्घष केला आहे. साधी राहणीमान, ना राजकीय वेषभूषा, ना बडेजावपणाचा लवलेश, शांत व संयमी स्वभाव व मितभाषी असेलले श्री. रविंद्र चव्हाण यांनी गेल्या काही वर्षात फक्त डोंबिवलीचे आमदार तसेच कल्याण-डोबिंवलीचे कार्यक्षेत्रापुरते तसेच ठाणे जिल्ह्यापुरती त्यांची मर्यादित ओळख गेल्या काही वर्षात त्यांच्या कार्यामुळे फुसली गेली होती. श्री.रविंद्र चव्हाण ख-या अर्थाने आपल्या कामाच्या जोरावर भाजपाच्या राज्य व राष्ट्रीय राजकारणात आपल्या कार्याने अधिक प्रभावी झाले होते. तरीही त्यांनी कधीही कॅमे-यासमोर न्यूज चॅनेल्स ना बाईट देणे, मुलाखती देणे हे त्यांनी नेहमीच कटाक्षाने टाळले. फक्त पक्षांच्या वरिष्टांच्या सूचना व त्यांच्या आदेशाचे पालन करुन ते काम १०० टक्के फत्ते करण्याची क्षमता रविंद्र चव्हाण यांच्यामध्ये कायमच दिसून आली. ठाणे व कल्याण डोंबिलवीच्या पत्रकारांमध्ये रविद्र चव्हाण यांची ब-यापैकी चर्चा असायाची पण मुंबईमधील विशेषता राजकीय बीटवर काम करणा-या पत्रकारांमध्ये रविद्र चव्हाण हे एकनाथजी शिंदे यांच्या एतिहासिक उठावानंतर ख-या अर्धाने चर्चेत आले व विविध चॅनेल्सवर रविंद्र चव्हाण यांचा फोटो झळकू लागला. एकनाथजी शिंदे यांच्या सुरत- गुवाहटी-गोवा व मुंबई या प्रवासादरम्यान त्यांची पडद्यामागची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे बोलेले जाते. परंतु या काळातही ते कधीही कॅमे-यासमोर आले नाहीत वा त्यांनी चॅनेल्सना फोनो दिल्याचे आठवत नाही. एकनाथजी शिंदे व देवेद्रजी फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधीमंडळात अधिवेशन काळात अनेक पत्रकारांनी त्यांना विविध प्रकारे गुवाहटीच्या विषयावर बोलते करण्याचे प्रयत्न केला. परंतु त्यांना फक्त त्यांच्य स्मित हास्याने उत्तर दिले, याचा मी साक्षीदार आहे. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आमचे नेते जो आदेश देतील त्याचे पालन करुन काम करीत राहणे हेच मला जमते असे ते नेहमी सांगतात.
शिंदे व फडणवीस यांच्या नवीन सरकारमध्ये पहिल्या १८ मंत्र्यांच्या कॅबिनेट विस्तारामध्ये रविंद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग (सार्वजनिक उपक्रम वगळून) व अन्न, नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण या जनसामान्यांशी निगडीत महत्त्वपूर्ण खात्याचा कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला. या विभागाच्या कारभाराची जबाबदारी आल्यानंतर तातडीने काही दिवसातच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले. या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी मधील आमदारांनी रविंद्र चव्हाण यांना संसदीय आयुधांच्या मार्फत विविध प्रश्नांचा भडीमार केला. पण कॅबिनेट मंत्री या नात्याने त्यांनी प्रत्येक सदस्याला अतिशय मुद्देसुदद उत्तरे दिली. याच पावसाळी अधिवशेनात मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचा व खड्याच्या प्रश्नाने विविध वृत्तपत्रांचे मथळे सजले व न्यूज चॅनेल्सच्या हेडलाईन्स गाजल्या. पण रविंद्र चव्हाण यांनी विधीमंडळात या प्रश्नाला समपर्क उत्तरे दिली. एवढेच नव्हे त्या भागातील संबंधित लोकप्रतिनिधीची तातडीची बैठक अधिवेशन काऴात आयोजित करुन हा प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळला.विभागाच्या अधिका-यांनी दिलेले सादरीकरण , आकडेवारी व अहवाल तसेच सरकारी बाबूंच्या उत्तरापर्यंत मर्यादित न राहता अधिवेशन संपल्यानंतर दुस-याच दिवशी मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीचा दोन दिवसाचा दौरा आयोजित केला. त्याचवेळी श्री.चव्हाण यांनी मला त्यांच्या माध्यम समन्वयकाची जबाबदारी सोपविली. लोकप्रतिनिधी व पत्रकार यांचा हा दौरा पनेवल पासून सुरु झाला व कणकवली-कुडाळ पर्यंत संपला. परंतु या दोन दिवसाच्या काळात श्री. चव्हाण यांनी प्रत्यक्ष ठिकठिकाणी सस्त्यावर उतरून तेथील खड्ड्याची तसेच दरडीच्या स्थितीची पाहणी करुन गणपतीपूर्वी या रस्त्यांची तातडीने दुरुस्तीचे आदेश त्यांनी अधिका-यांना दिले. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी त्यांनी आपल्या कल्पकतेने नवीन तंत्रज्ञान वापरण्याच्या सूचना विभागाच्या अधिका-यांना दिला. एवढेच नव्हे तर या संपूर्ण रस्यांवरील खड्यांचे काम युध्दपातळीवर पूर्ण करुन गणपतीसाठी कोकणवासी व चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी दोन एवजी किमान १० एजन्सीकडे काम देऊन हे काम तातडीने व दिवस-रात्र पूर्ण करण्याचे आदेश दिल्यानंतर गणपतीच्या काळात रस्त्यांवरील खड्डयांची विघ्न मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलं. या दौ-यात पत्रकार असल्यामुळे जेवढे सरळ तितकेच तिरकस प्रश्नांचा भडिमारही त्यांच्यावर झाला. पण त्यांच्या प्रत्येक प्रश्नाल त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण उत्तर दिली. त्यांच्या या दौ-यात कोकणवासियांसाठी या महामार्गाच्या माध्यमातून काही तरी चांगले करण्याची जिद्द व सकारत्मकता पाहावयास मिळाली. दोन दिवसांच्या या दौ-यात शासकीय विश्रामगृह असो वा अन्य ठिकाणी स्थानिक नागरिकांच्या हजारो निवेदनांचा पाऊस त्यांच्यावर पडला. परंतु प्रत्येक निवेदन नीट समजून घेऊन उपस्थित अधिका-यांना योग्य निर्देश देऊन त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला समाधान दिले. तेव्हा त्या कार्यकर्त्याच्या चेह-यावर आपलाच मंत्री असल्याचा विश्वास पाहायला मिळाला.
कॅबिनेटमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांना केंद्रिय रस्ते व महामार्ग मंत्री नितिनजी गडकरी यांच्याकडून राष्ट्रीय़ पातळीवरील मंथन या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे निमंत्रण आले. या परिषदेला देशभरातील सर्व राज्यातून सार्वजनिक बांधकाम मंत्री व परिवहन मंत्री उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेच्या व्यासपिठावरुन महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करताना रविद्र चव्हाण यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील रस्ते, वाहतूक व दळणवळण यंत्रणा सुधारण्यासाठी व अधिक सक्षम करण्यासाठी त्या भागात किमान ५०० ते ६०० साकव (लहान पूल) बांधण्याची मागणी केली. केंद्रीय मंत्री गडकरीजी यांनाही श्री. रविंद्र चव्हाण यांच्या या प्रस्तावावर अनुकुलता दर्शविली व केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला सकारात्मक व पुरेशा निधी देण्याचेही मान्य केली. यावेळी रविंद्र चव्हाण यांनी मांडलेल्या त्या भाषणातून एखाद्या प्रश्नाला मुद्देसुद पध्दतीने मांडून न्याय देण्याचा अनुभव आला.
१५ सप्टेंबरचा दिन राष्ट्रीय इंजिनियरिंग दिन म्हणून भारतात साजरा करण्यात आला. यावेळी या खात्याचे मंत्रीम रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने हा दिवस मुंबईत षष्णमुखानंद सभागृहात काहीच दिवसांपूर्वी शानदारपणे साजरा करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दरवर्षी पुरस्कार देण्याची परंपरा आहे. परंतु या विभागाचे हे पुरस्कार विविध कारणांमुळे २०१३-१४ पासून प्रलंबित होते. पंरतु हा विषय विभागाच्या सचिवांमार्फत निर्दशनास आल्यानंतर रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेऊन तब्बल ६५ अभियंत्यांना या दिवशी आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले. यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र स्वीकारताना पुरस्कारप्राप्त अभियंत्याच्या चेह-यावर एक वेगळा आनंद व विश्वास पाहायाल मिळाला. २०१८-१९ पर्यंतच्या सर्व पुरस्कारांचा बॅकलॉग भरुन काढून आपल्या कार्यपध्दतीतून त्यांनी विभागाच्या अभियंत्यांमध्ये नवीन उत्साह व प्रेरणा निर्माण करण्याचे काम केले. विभागाच्या कार्यक्रमांना त्या विभागाचा मंत्री उदघाटन व पुरस्कारपुरते उपस्थित राहून व भाषण करुन त्यांच्या पुढील कार्यक्रमांना रवान होतात. परंतु मंत्री चव्हाण हे पूर्ण वेळ म्हणजेच सुमारे चार तास उपस्थित राहिले. एवढेच नव्हे तर विभागाची कार्यपध्दती अधिक सक्षम व सुधारण्याच्यादृष्टीने त्यांनी त्या दिवशी आयोजित केलेल्या कार्यशाळेत अभियंत्याकडून जाहिरपणे सूचना मागविल्या. मंत्री महोदयांनी त्या सूचना नीट समजून घेतल्या व सकारत्मरित्या या विषयावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिली. मंत्री महोदयांच्या या कल्पकतेचे अनेक अभियंत्यांनी कौतुक तर केलेच पण विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण व उत्तम सुचना दिल्या. त्यानंतर मंत्री चव्हाण यांनी केलेल्या आपल्या सुमारे ४० मिनिटांच्या अतिशय समर्पक भाषणात विभागाचा कारभार सर्वोत्तम करण्याच्या दृष्टीने कानमंत्र दिला. विभागातील अधिकारी व अभियंते यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. विभागाचा कारभार सुधारण्याच्या दृष्टीने काही मोजक्याच गोष्टी अतिशय शांतपणे सांगितल्या. जनसामान्यांशी जोडलेल्या या विभागाचा कारभार सुधारण्याच्या दृष्टीने व अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वांनी स्वच्छ व पारदर्श कारभार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी दिले. मंत्री म्हणून त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा फक्त मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातच नव्हे तर राज्यातील विभागांच्या कार्यालयांमध्ये सुरु होती.
प्रशासनाच्या सचिव स्तरावरील बैठका असो वा विभागाच्या बैठका. एखाद्या नवीन योजनेचे सादरीकरण असो वा एखाद्या प्रलंबित कामाचा फॉलो अप यामधून त्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे कौशल्य पाहावयास मिळाले. विभागाचे काम करताना काही तरी चांगले व सर्वोत्तम करण्याचा निर्धारही बैठकीमधील अधिका-यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करायचा.
एखाद्या विषयाचा अभ्यास करुन तो विषय कधी प्रशासकीय कौशल्य वापरुन तर कधी आक्रमकपणा वापरुन जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा निर्धार व एक जिद्द त्यांच्या कार्यपधद्तीतून जाणवते. कार्यालयीन कर्मचारी व अधिका-यांची आपुलकीने केलेली विचारपूस त्यांच्यामधील संवेदनशील व्यक्तीमत्वाचे दर्शन घडवितो. कुठलीही गोष्ट, प्रश्न वा विषय टाळण्यापेक्षा व त्यामध्ये पळवाटा शोधण्यापेक्षा तो विषय व प्रश्न कश्या पध्दतीने धसास लावून सामान्यांना कसा न्याय मिळवून देता येईल याची जाणीव करुन देणारे हे एक व्यक्तिमत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार विकासाच्या महामार्गावर आपले ध्येय नक्कीच यशस्वीपणे व समर्थपणे पूर्ण करील. सरकारमधील कॅबिनेट मंत्री या नात्याने रविंद्र चव्हाण यांनी उचलेले विकासाचे हे शिवधनुष्य त्यांची कार्यशैली व कार्यपध्दतीनुसार नक्कीच सर्व लक्ष्य गाठेल हा विश्वास या निमित्ताने मला दिसून येत आहे.
गोविंद येतयेकर
माध्यम सल्लागार