अनेक मराठी साप्ताहिके आणि मासिके बंद पडत असतांना ‘डोंबिवलीकर’ नावाचे एक छान मासिक हातात पडले तेव्हा असे वाटले की हे डोंबिवलीत राहणाऱ्या मराठी नागरिकांच्या घडामोडींची नोंद घेणारे एखादे हाऊस मॅगझिन असावे. परंतु चाळल्यानंतर लक्षात आले की, • केवळ डोंबिवलीकरांची नोंद घेऊन हे मासिक थांबत नाही तर डोंबिवलीकरांविषयी बोलता बोलता महाराष्ट्रातील कला, चित्रपट, साहित्य, नाटक अशा अनेक अंगांनी, महाराष्ट्रातील सांस्कृतिक घडामोडींचा एक स्वच्छ आरसाच ते आपल्यापुढे धरते.
तसे पाहायला गेले तर मुंबई-पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक शहरे आज कात टाकत असून आपल्या परीने नवनवीन उपक्रम सादर करीत आहेत. परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या शेजारी कोण राहत आहे हेसुद्धा माहीत नसतांना, ज्या उपनगरात किंवा शहरात आपण राहतो त्याची पुरती ओळख असणे कठीण वाटते. आपल्या शहरात अनेक चांगले उपक्रम सादर होतात, परंतु त्याची माहिती नसल्यामुळे त्याचा आनंद घेता येत नाही. डोंबिवलीकरसारखे मासिक ही उणीव दूर करून आपण ज्या परिसरात, शहरात राहतो त्याचा आपल्याला अभिमान वाटावा असे वातावरण निर्माण करू शकेल, असे वाटते.
आपल्या परिसरातील समाजात एकोपा राहावा, विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी असे मासिक अतिशय उपयुक्त ठरू शकते. डोंबिवलीकर मासिकाचे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, तंत्रज्ञ, कलाकार, लेखक, नाटककार, कलावंत, सामान्य नागरिक या सर्वांनाच या मासिकात मानाचे स्थान दिले जाते आणि माहिती व मनोरंजन याबरोबरच समाजाचे निकोप संवर्धनसुध्दा केले जाते. शिवाय हे करीत असतांना आपण फार मोठे काम करत आहोत असा आव त्यात कुठेही दिसत नाही.
समाजाची आजची आवड-निवड लक्षात घेऊन आबालवृद्धांना आवडेल अशा पद्धतीने विषयांची आकर्षक मांडणी केलेली प्रत्येक अंकात दिसते. मला असे वाटते, डोंबिवलीकर हे केवळ डोंबिवलीकर नागरिकांपुरते मर्यादित राहणारे मासिक नसून, मुंबई-पुणे-नाशिक आणि इतरही शहरांत हे मासिक सहज पोहोचू शकेल. अशा प्रकारचे मासिक हे केवळ एक मासिक न राहता एकमेकांशी दुवा साधण्याचे एक महत्त्वाचे साधन बनू शकते. डोंबिवली शहराप्रमाणेच नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी अशा प्रकारची मासिके निघू शकतात आणि तेथील साहित्यिक कलाकारांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतात. अशा प्रकारची एक आगळीवेगळी संस्कृती त्यातून उभी राहू शकते.
कोणत्याही प्रकारचा अभिनिवेश न बाळगता, अतिशय सुंदर मासिक डोंबिवलीकरांना सातत्याने दिल्याबद्दल मासिकाचे संस्थापक आणि संपादक श्री. रविंद्र चव्हाण यांचे हार्दिक अभिनंदन. सामाजिक आणि राजकीय काम करीत असतांनाच आपल्या परिसरात उत्तम प्रकारचे सांस्कृतिक काम कसे करावे आणि कलाकार आणि साहित्यिक यांना उत्तम व्यासपीठ कसे उभे करून द्यावे, हे डोंबिवलीकर मासिकाद्वारे रविंद्र चव्हाण यांनी दाखवून दिले आहे. सांस्कृतिक चळवळीचे माध्यम असलेले ‘डोंबिवलीकर’ हे मासिक अधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यातून एक सांस्कृतिक चळवळ उभी राहावी ही माझी शुभेच्छा !
– प्रकाश बाळ जोशी ज्येष्ठ पत्रकार व चित्रकार