आज राजकारण हा ताकदीचा आणि कुरघोडीचा खेळ झाला आहे. याच कारणामुळे सामान्य माणूस क्रियाशील राजकारणापासून दुरावला आहे. शून्यातून स्वतःचे स्थान निर्माण करणारे राजकारणी आजकाल फार दिसत नाहीत; दिसले तरी समाजकारणाकडे पाठ आणि राजकारणाकडे पोट अशी त्यांची अवस्था असते. अर्थात या परिस्थितीला काही अपवाद आहेत. त्या अपवादांपैकी एक म्हणजे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण.
कार्यकर्त्यांचा आमदार होतो आणि तो आमदार झाला की तो स्वतःतल्या कार्यकर्त्याचे विसर्जन करतो. सुदैवाची गोष्ट म्हणजे रविंद्र चव्हाण
हे आमदार आणि नंतर मंत्री झाल्यानंतरही त्यांच्यातला अस्सल कार्यकर्ता अजून जिवंत आहे आणि यापुढेही जिवंत राहील अशी खात्री आहे.
काही दिवसांपूर्वी मी डोंबिवलीला गेलो होतो. स्टेशनमधून बाहेर आलो तर डोंबिवली रेल्वे स्थानकात स्वयंचलीत सरकते जिने बसवावे जेणेकरून आबालवृद्धांची सोय होईल, यासाठी आमदार रविंद्र चव्हाण यांच्यावतीने स्वाक्षरी मोहीम सुरू होती. आश्चर्य म्हणजे स्वतः श्री रविंद्र चव्हाण हे टेबल टाकून तेथे बसले होते. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाशी बोलत होते, बहुतेक लोकप्रतिनिधी जनतेच्या रोषाला घाबरून, वारंवार लोकांपुढे जाण्याचे टाळतात आणि इथे आमदार चव्हाण सगळ्या समस्या लक्षपूर्वक ऐकत होते. लोकांपुढे जाण्यासाठी संयम लागतो, कार्यावरची निष्ठा लागते आणि मुख्य म्हणजे लोकांवरचं प्रेम लागतं. ते रविंद्र चव्हाणांकडे नक्कीच आहे यात शंका नाही.
आमच्या ‘ग्रुम अॅण्ड ग्रो डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट प्रा.लि’तर्फे अठरा ते पंचवीस वयोगटातील तरूणांमध्ये नोकरी लागण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य रुजवण्यासाठी आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांनी ही एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. जवळपास १५०० हून अधिक विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झालें होते. काही कार्यक्रमात हार-तुरे करण्यातच वेळ जातो व मूळ राहतो. पण डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या या अभूतपूर्व कार्यक्रमात रविंद्र चव्हाण हे स्टेजवर फक्त ५ मिनिटे थांबले. वेळेचं महत्त्व काय असते हे जाणणारा त्यांच्यातला लोकप्रतिनिधी मला जाणवला. ते कला, क्रीडा आणि संस्कृती हे डोंबिवलीचे वैभव अबाधित ठेवण्याचे कामही ते आनंदाने करतात, ही अजून एक उल्लेखनीय ‘गोष्ट.
माणूस पन्नास वर्षांचा झाला की, कौतुक सोहळे होतात. पण आमदार श्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्त्वाने हा कौतुक सोहळा फार पूर्वीच आधीच खेचून आणला आहे. म्हणजेच जुन्या आणि नव्या विचारांना- जुन्या आणि नव्यापिढीला जोडणारा सेतू म्हणूनही आपल्याला त्यांच्याकडे पाहता येईल. त्यांची जनतेबद्दलची सेवाभावी वृत्ती अबाधित राहो, धडाडीची वृत्ती चिरतरूण राहो, स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळो आणि आजवर ते जसा राजकारण आणि समाजकारण यांचा मेळ साधत आले आहेत तो मेळ साधण्याची कला त्यांच्यापाशी आजन्म राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा !
संजीव लाटकर
ज्येष्ठ पत्रकार व समुपदेशक